रविवार, मई 15, 2011

हिन्दी सिनेजगत: बदलांच्या वळणावर...


चल येतोस का सिनेमाला? असं कुणी विचारलं तर, आधी मी त्या सिनेमाचे नाव काय आहे किंवा त्यात कोणी काम केलेले आहे, हे न विचारता, त्या सिनेमात "आईटेम साँग" आहे का? हे जरूर विचारतो. आता तुम्ही विचाराल हा काय प्रश्न झाला? आजकाल तर प्रत्येक सिनेमात "आईटेम साँग" असतेच, तो चित्रपटाचा एक अविभाज्य भागच झाला आहे आणि किंबहुना "आईटेम साँग"च बघायला बहुंताशी लोकं जात असावीत. हिन्दी सिनेमाबरोबर मराठी सिनेमा सुध्दा ह्या "आईटेम साँग"च्या कचाट्यातून सुटलेला नाही. परंतु, सिनेमाचा विषय व पटकथा उत्तम असेल तर त्या चित्रपटाला "आईटेम साँग"च्या आधाराची गरज़ नसते, या मताचा मी आहे. आणि म्हणूनच एखादा सिनेमा पहावा की नाही यासाठी त्या चित्रपटामध्ये "आईटेम साँग" नसण्याचा निकष मी लावतो. पूर्वीच्या, म्हणजे ७०-८० च्या दशकातील सिनेमामध्ये सुध्दा (एकाप्रकारे) "आईटेम साँग" असायची - म्हणजे "कॅब्रे साँग", जी (बहुतेक वेळा) आशा भोसले यांनी गायलेली असायची, हेलनने त्यामध्ये नृत्य केलेले असायचे व आर. डी. बर्मनने संगीत दिलेले असायचे. असे असले तरी त्याचबरोबर, सिनेमाचा विषय व पटकथा सक्षम असायची. असो, "आईटेम साँग" हाच केवळ ह्या लेखाचा विषय नाही.

७०-९० च्या दशकामध्ये कलात्मक सिनेमांची निर्मिती होत होती. काही दिग्दर्शक/निर्माते (उदा. गुलज़ार, बासु चटर्जी, हॄषिकेश मुखर्जी, सई परांजपे इत्यादी.) असे पण होते की जे कलात्मक व व्यावसायिक सिनेमे या दोहोंचा संगम असलेल्या सिनेमांची निर्मिती करायचे - ज्याद्वारे मनोरंजनाबरोबर एखादा सामाजिक विषय व नविन विचार प्रेक्षकांसमोर मांडला जात असे. अशाप्रकारचे सर्वच सिनेमे प्रेक्षकांपर्यंत पोचले नाहीत आणि याला मुख्य कारण असे होते की वितरकांना त्यात पैसे मिळत नसायचे. गुलज़ार यांचा "लिबास" हा असाच एक चित्रपट आहे, ज्याची निर्मिती पूर्ण झालेली आहे, त्याचे संगीत सीडी वर उपलब्ध आहे, परंतु आजतागायत हा सिनेमा थिएटरला प्रदर्शित झालेला माझ्या ऐकिवात नाही. या सिनेमाची गाणी आर. डी. बर्मन यांनी संगीतबध्द केलेली होती आणि ती लोकप्रिय झालेली आहेत. अजून एक बाब म्हणजे, या सिनेमात नसीरद्दीन शाह, राज बब्बर, शबाना आज़मीउत्पल दत्त या कलाकारांनी अभिनय केलेला आहे. गुलज़ार यांचा हा सिनेमा पाहण्याची मला खूप उत्सुकता आहे व कधीतरी हा सिनेमा प्रदर्शित होईल, अशी मी आशा अजुनही बाळगून आहे.

८०-९० च्या दशकामध्ये, रोमँटिक सिनेमांची लाट आली होती. यामध्ये बाज़ीगर, कयामत से कयामत तक, आशिकी, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, साज़न, हम आपके है कौन, राम लखन, खलनायक वगैरे संगीतप्रधान सिनेमे येऊन गेले. या लाटेमध्ये संगीताचे बाज़ारीकरण (commercialization) झाले. जे विकले जाईल तेच निर्मित केले जायचे, त्यामुळे नाविन्यपूर्ण विषय व त्याचबरोबर उत्तम व प्रयोगशील संगीत यांकडे दुर्लक्ष केले गेले. कारण बाज़ारीकरणामध्ये निर्मात्यांना व वितराकांना हा धोका पत्करायचा नव्हता. खात्रीशीर नफ़ा देणारे चित्रपट व संगीत यांचीच निर्मिती केली गेली. संगीताच्या बाज़ारीकरणाची ही लाट, उत्तम प्रतिभा, प्रयोगशीलता व नाविन्य असलेले काही चांगले दिग्दर्शक व संगीतकार आपल्यापासून दूर घेऊन गेली.

गेल्या काही वर्षांमध्ये झालेल्या बदलांमधील चांगला भाग म्हणजे, सिनेमांची निर्मितीसंख्या वाढली आहे, नफ़ा वाढला आहे व निर्मितीकरिता लागणारे खेळते भांडवल सुध्दा बाजारात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. असे म्हणले जाते की फ़ॅशनजगतामध्ये पूर्वीचीच फ़ॅशन बदलस्वरूपात पुन्हा एकदा (साधारणतः १० वर्षांनंतर) येत असते व हिन्दी सिनेजगत पण याला अपवाद नाही. नुसतेच "आईटेम साँग" असलेले सिनेमे नाही तर, वेगळया धाटणीचे, नाविन्य व प्रयोगशीलता असलेले सिनेमेसुद्धा आता येत आहेत, आणि ही एक चांगली बाब आहे. अशा सिनेमांची निर्मिती करण्यामध्ये, काही नवोदित निर्माते व दिग्दर्शक आहेत तर काही कलाकार पण आहेत. आमीर खान हा अभिनेता अशा वेगळया धाटणीचे, नाविन्य व प्रयोगशीलता असलेल्या सिनेमांच्या निर्मितीकरिता फ़िल्म इंडस्ट्रीमध्ये प्रसिध्द आहे. लगान, दिल चाहता है, रंग दे बसंती, फ़नाह, तारे ज़मीन पर, गज़नी, थ्री इडिएटस, धोबी घाट, इत्यादी त्याचे सिनेमे "आईटेम साँग" नसून सुध्दा बॉक्स ऑफ़िसवर उत्तम चालले व इतकेच नाही तर काही चित्रपट ऑस्कर पुरस्काराकरिता नामांकित पण केले गेले. आणखीन काही निर्माते व दिग्दर्शकांमध्ये, विशाल भारद्वाज, विधू विनोद चोप्रा, संजय लीला भन्साळी व राजकुमार हिरानी यांची नावे देता येतील. अगदी अलीकडचे उदाहरण म्हणजे लारा दत्ता, जिने आपला पति (प्रसिध्द खेळाडू) महेश भूपती बरोबर काढलेला "चलो दिल्ली" हा सिनेमा. येथे आणखी एका सिनेमाचा मला आर्वजून उल्लेख करावासा वाटतो व तो सिनेमा म्हणजे "वेनस्डे (Wednesday)". वेनस्डे हा एक असा चित्रपट होता की तो सक्षम कथा/पटकथा, उत्तम दिग्दर्शन, अभिनय व सादरीकरणांमुळे प्रेक्षकांची गर्दी व प्रशंसा मिळवण्यात यशस्वी झाला. ह्या सिनेमामध्ये "आईटेम साँग" तर दूरच, पण एकही गाणे असे नव्हते व अवाढव्य निमिर्ती खर्च तर मुळीच नव्हता, हे विशेष!

बदलांमधील आणखिन एक चांगला भाग म्हणजे, कथेतील बदल. याआधी मल्टीस्टारकास्ट सिनेमे निर्मित केले जायचे व यामध्ये मनमोहन देसाई, सिप्पी ब्रदर्स व सुभाष घई या निर्मात्यांची नावे समोर येतात. अमर अकबर अँथनी, जॉन जॉनी जनार्दन, शान, कर्मा, राम लखन इत्यादी सिनेमे उदाहरणदाखल देता येतील. या सिनेमामध्ये प्रत्येक हिरोंच्या आपपल्या प्रेमकथा, अ‍ॅक्शन व मेलोडियस गाणी (आणि बिग बी अमिताभ बच्चन) या गोष्टी प्रेक्षकांना थिएटरकडे खेचून आणित असत. अलिकडच्या चित्रपटांमध्ये मल्टीस्टारकास्ट जरी नसली तरी, चांगल्या बदलाचा एक भाग म्हणून, तीन ते चार कथा एकाच वेळी दाखवणारे सिनेमे निर्मित केलेले दिसून येतात. अशा चित्रपटवर्गांमध्ये, मुंबई मेरी जान, ये मेरा इंडिया, मेट्रो, धोबी घाट व नुकतेच प्रदर्शित झालेले "आय एम" (I am...) व शोर इन द सिटी (Shor in the city) हे चित्रपट येतात. या चित्रपटांमध्ये तीन चार कथा दाखविण्यात आलेल्या आहेत, ज्यामध्ये प्रत्येक कथेमध्ये एक वेगळी परिस्थिती, वेगळया वयोगटातील नायक-नायिका, किंवा फ़क्त नायक, अथवा फ़क्त नायिका दिसून येतील. या सिनेमांमध्ये दिसून येईल की गाण्यांना महत्व कमी आहे व गाणी बॅगराऊँडमध्ये वापरण्यात आली आहेत. महत्वाची बाब म्हणजे अशा वेगळया धाटणीच्या चित्रपटांना निर्माते व वितरक आता मिळत असून, प्रेक्षकवर्ग पण पसंती दाखवत आहे. ह्या प्रेक्षकवर्गामध्ये तरूणांची संख्या पण तेवढीच दिसून येण्याएवढी आहे. आणखी काही वेगळया टाईपच्या अशा चित्रपटांबद्दल लिहायचे झाले तर "संकट सिटी", दस तोळा (या दोन्ही चित्रपटांमध्ये प्रसिध्द मराठी कलावंत दिलीप प्रभावळकर यांनी एक वेगळी व छान भूमिका केलेली आहे), रामचंद पाकिस्तानी, महारथी, रोड टू संगम (यामध्ये मराठीतील कलावंत स्वाती चिटणीस यांनी उत्तम भूमिका केलेली आहे), सोच लो, फ़ँस गए रे ओबामा, तेरे बिन लादेन हे मला आवडलेले सिनेमे आहेत. परंतु हे सिनेमे १-२ अठवडयापेक्षा जास्त काळ थिएटरमध्ये राहिलेले नाहीत, त्यामुळे वेळेवर न बघितल्यास हे सिनेमे आपल्याला नंतर सीडीवर बघावे लागतात. टिव्ही चॅनेलवर पण हे चित्रपट दाखवले जाण्याची शक्यता फ़ार कमी आहे. असे असून सुध्दा, असे वेगळयाप्रकारचे चित्रपट निर्मिले जात आहेत, हे काही थोडे थोडके नाही.

इंटरनेट व सोशल नेटवर्कींग (social networking) या माध्यमांचा अशा चित्रपटांच्या प्रसिध्दी मध्ये मोलाचा वाटा आहे. एखादा चित्रपट आवडला की, माऊथ पब्लिसिटी प्रमाणेच इंटरनेट (ई-मेल, चॅटींग) व सोशल नेटवर्कींगच्या (फ़ेसबुक, ट्विटर, गुगल बज़ इत्यादी) विविध संकेतस्थळांमधून ह्या चित्रपटांचे परिक्षण (reviews) दिले जाते व त्यातून अशा वेगळया धाटणीच्या चित्रपटांचा प्रेक्षकवर्ग वाढायला मदत होत आहे. त्यामुळे अशा चित्रपटांच्या निर्मितीसंख्येमध्ये अधिक-अधिक वाढ होत आहे. नविन कलावंत सुध्दा एकाच टाईपच्या भूमिकेमध्ये राहून पैसे कमवण्यापेक्षा, अशा चित्रपटांमधून विविध प्रकारच्या भूमिका करण्याचे धाडस करताना दिसून येत आहे व ही निश्चितच उल्लेखनीय बाब आहे.

असे वेगळेपण व विविधता जरी चित्रपटांमधून दिसून येत असली तरी ती चित्रपटांच्या गाण्यांमधून अजून दिसत नाहिये. एकाच टाईपची गाणी, ठराविक पाश्चात्य रिदमवर दुःखी व आनंदी गाणी रचल्याचे दिसून येते. एखादी वेगळी रचना, काही नविन प्रयोग, नविन वाद्यांचा वापर यांचा अभाव प्रकर्षाने जाणवतो. डिजे व्हर्जन (DJ version) करतायेतील अशी गाणी तयार केली जातात, कारण चित्रपट जरी चालला नाही तरी नंतर डिजे व्हर्जन अथवा रिमिक्स व्हर्जन मार्फ़त ही गाणी हिट करून आणखी जास्त पैसे ओढण्याचा प्रयत्न केला जातो. गीतलेखन किंवा गाण्याचे शब्द या बदलांमध्ये मागे पडत चालले आहे. गाण्याचे शब्द अगदी क्वचितच ऐकू येतात. एकंदरीत आजकाल झिंगून नाचता येण्यासारख्या रिदमवर आधारित गाण्यांना अधिक पसंती दिली जात आहे. म्हणूनच कि काय, तर गीताचे शब्द जरी चांगले नसले तरी "मुन्नी बदनाम हूई" व "माय नेम इज़ शीला, शीला की ज़वानी" सारखी गाणी सुपरहिट होऊन, एखाद्या सोहळयात पुरस्कार मिळवून जातात व नंतर सणांच्या दिवशी (होळी, गणेशोत्सव) सगळयांना झिंगायला पुरेपूर मदत करतात. खलनायक चित्रपटातील "चोली के पीछे क्या है.." हे गाणे बरेच वादग्रस्त झालेले होते, व ह्या गाण्याच्या विरोधात माध्यमांमधून व समाजामधून बरीच ओरड झाली होती. तो विरोध व ती ओरड, "मुन्नी बदनाम हूई" व "माय नेम इज़ शीला, शीला की ज़वानी" ह्या गाण्यांच्या बाबतीत कुठेच दिसून आली नाही. कदाचित, अशी "आईटेम साँग" गाणी आता आपल्या सर्वांच्या अंगवळणी पडली असावीत (?)

आज गाण्यांची ही परिस्थिती असली तरी काही चांगल्या गोष्टी पण घडत आहेत. काही चांगली गाणी असणारे चित्रपट अजूनही येत आहेत. "तारे ज़मीन पर" अथवा "थ्री इडिएटस" या अशा वेगळया चित्रपटांमधील गाणी उदाहरणदाखल देता येतील, ज्यामध्ये संगीत व गाण्यांचे शब्द दोन्ही तितकेच प्रभावी आहेत. मराठी सिनेमांमधील उदाहरण द्यायचे झाल्यास, "आता वाजले की बारा, मला जाऊ द्या ना घरी" हे गाणे पारंपारिक लावणी स्वरूपातील असून, "आईटेम साँग" जरी नसले, तरी उत्तम संगीत, शब्द व सादरीकरणामुळे सुपरहिट झाले व प्रेक्षकांची गर्दी खेचण्यामध्ये यशस्वी झाले.

तसेच पूर्वी तयार केलेली पण आजतागायत प्रदर्शित न झालेली गाणी, आज श्रोत्यांपर्यंत पोचवण्याचे काम काही नामवंत म्युझिक कंपन्या करत आहेत. युनिर्व्हसल म्युझिक (Universal Music) ही त्यापैकी एक कंपनी आहे. या कंपनीने काही स्पेशल अल्बमच्या माध्यमातून, मदन मोहन, मोहमंद रफ़ी, आर. डी. बर्मन यांची प्रदर्शित न झालेली गाणी रसिकांपर्यंत पोहचवण्याचे अनमोल काम केलेले आहे. ही गाणी अशी होती की जी तयार केली गेलेली होती, परंतु चित्रपटांच्या व सीडीच्या अथवा एलपीच्या लांबीच्या मर्यादेमुळे, तसेच काही इतर कारणांमुळे प्रदर्शित होऊ शकली नाहीत. प्रसिध्द चित्रपट निर्माते यश चोप्रा यांनी सुध्दा मदन मोहन यांच्या काही न वापरलेल्या चाली घेऊन, वीरझारा या चित्रपटांमध्ये वापरून, ती गाणी सुप्रसिध्द करून दाखविली आहेत. वीरझाराच्या गाण्याच्या अल्बममध्ये एक स्पेशल सीडी अशी प्रदर्शित केलेली आहे की ज्यामध्ये खुद्द मदन मोहन यांच्या आवाज़ात ह्या गाण्यांच्या चाली आपल्याला ऐकायला मिळतात. तसेच युनिर्व्हसल म्युझिकने अनटोल्ड स्टोरीज़ (Untold Stories) ह्या अल्बमद्वारे आर. डी. बर्मन यांच्या काही गाण्याच्या चाली कशा तयार झाल्या, त्याच्याशी निगडित रंजक गोष्टीं काय होत्या, ही माहिती रसिकांपर्यंत पोचवण्याचे प्रशंसनीय काम केलेले आहे.

चित्रपट माध्यमात होत असलेले हे बदल, वेगळयाप्रकारच्या ("आईटेम साँग" विरहीत...) चित्रपटांची निर्मिती व त्यांचा वाढता प्रेक्षकवर्ग, ही निश्चितच नविन कल्पनांना प्रोत्साहित करणारी, कल्पनाशक्तीला वाव देऊन, वैविध्यपूर्ण चित्रपट आपल्या प्रेक्षकवर्गाकरिता घेऊन येणार आहे, याची मला खात्री आहे. प्रत्येक बदल हा काही चांगले व काही वाईट आपल्याबरोबर घेऊन येत असतो. या बदलांमधील चांगल्या बाबींना पसंती देऊन, आपल्या भावी पिढीकरिता, एक चांगली चित्रपट संस्कॄती निर्माण होण्यामध्ये व ती टिकवण्यामध्ये आपल्या प्रेक्षकवर्गावर महत्वाची जबाबदारी आहे. चॉईस हा आपला असणार आहे! आणि मग मलासुध्दा चित्रपटाला जाताना त्यात "आईटेम साँग" आहे का नाही, हा प्रश्न विचारायची गरज़ भासणार नाही...

शैलेन्द्र मुसळे, पुणे (Shailendra Musale, Pune. E-mail: smusale@gmail.com)
------------------------------------------------------------------------------------------------------------------------

लेबल: , , ,