शुक्रवार, अगस्त 25, 2006

रस्त्यांवरील खड्डयांचा "मेक-अप" करणे सोडून द्या !

रस्त्यांवरील खड्डयांचा "मेक-अप" करणे सोडून द्या !

सलग दुसऱ्यावर्षीही पडण्याऱ्या मुसळधार पावसांमुळे रस्त्यांवरील खड्डे पुनःश्च जिवंत झालेले आहेत व त्यांबद्दल वर्तमानपत्रांमधून बरेच काही लिहून येत आहे. रस्त्यांवरील खड्डे परत जिवंत होऊ नयेत म्हणून, शास्त्रोक्‍त पध्दतीने ते कसे मिटवता येतील या संदर्भात अनेक तज्ञांकडून मार्गदर्शकपर लेख पण प्रसिध्द झालेले आहेत.

नेमेची येतो पावसाळा, त्याप्रमाणे पुण्यातील रस्त्यांच्या बाबतीत पण काही गोष्टी नेमेचीच होतात. म्हणजे असे की, नेमेचीच येतात रस्त्यांवरील खड्डे, खड्डयांच्या कामांतील व चालू असलेल्या रस्त्यांच्या कामांतील दिरंगा‌ई. आणि मग नागरिकांची निदर्शने होतात. या सर्व "उलाढालीं"मध्ये, रस्त्यांचा वापर करणारा सामान्य नागरिक मात्र, दररोज खड्डयांची परीक्षा दे‌ऊन दे‌ऊन स्वतः परीक्षार्थी हो‌ऊन जातो. तर दुसरीकडे काही गट (उदा. राजकीय पक्ष, कंत्राटदार, महानगरपालिकेतील काही विभाग इत्यादी) लाभार्थी गटांमध्ये सामावल्यामुळे जास्तीत जास्त मेवा खा‌ऊन तॄप्त असतात. या लाभार्थी गटाकडे नजर टाकली तर या सर्व "उलाढालीं"चा व्याप "नेमेची" का होतो, याचा उलगडा कुठल्याही सुज़ाण नागरिकाला होईल. एखादा राजकीय पक्ष ही संधी पकडून आपली व आपल्या पक्षाची प्रसिद्धी करून घेतात. पावसाळा तोंडावर आला असताना, रस्तेबांधणी व रस्तेदुरूस्तीची कामे योगायोगाने (?) अर्धवटच राहतात, आणि मग ही कामे घेणारे कंत्राटदार अर्जंट बेसिस-वर महानगरपालिकेला अर्जंट चार्जेस लावून, रस्त्यांची व रस्त्यांवरील खड्डे-बुज़वण्याची कामे कशीतरी करून मोकळी होतात. पुन्हा मुसळधार पा‌ऊस पडून गेला की परत खड्डे पुर्नजन्म घेऊन पृथ्वीतलावर अवतरतात. मग परत नागरिकांची ओरड, कंत्राटदार पुन्हा हे खड्डे ढिगळे लावल्याप्रमाणे झटपट भरून मोकळे होतात. आणि मग, मेक-अप केलेला चेहरा पाण्याने धुतल्यावर, जसा मेक-अप निघून जातो, तसे रस्त्यांवरील कात झडून जाऊन, त्यांच्यावरील खड्डे पुनःश्च अवतीर्ण होतात.

अशाप्रकारची कामाची पध्दत जणू काही सॉफ़्टवे‌अर क्षेत्रातून आली काय असे वाटायला लागते. सॉफ़्टवे‌अर क्षेत्रामध्ये, बाजारात रिलिज़ (release) झालेले सॉफ़्टवे‌अरचे एखादे व्हर्जन (version) कधीच परिपूर्ण नसते. त्यात काहीप्रमाणात त्रुटी (bugs) राहिलेल्या असतात आणि सॉफ़्टवे‌अर कंपन्या ह्या त्रुटी भरून काढून एकामागोमाग एक अशी सॉफ़्टवे‌अरची व्हर्जन्स बाजारात रिलिज़ करत असतात. काहीसे अशाच प्रकारचे चित्र, आजकाल अनेक क्षेत्रांमध्ये दिसते. बाजारात एकामागोमाग सारख्या येणाऱ्या मोटारबा‌ईक्सची विविध मॉडेल्स, याचे एक उत्तम उदाहरण म्हणून देता ये‌ईल. एखादे उत्पादन अथवा सेवा परिपूर्ण अन समाधानपूर्वक दिली जाणे, असे आजकाल फ़ार क्वचितच पहायला मिळते. कदाचित आजच्या या जागतिकीकरणाच्या युगात, अशाप्रकारे अर्धवट सेवा व अर्धवट उत्पादन पुरविणे, हा आर्थिक प्रगतीचा एक यशस्वी मार्ग होऊन बसलेला आहे, याची जाणीव होते.

अशाप्रकारे, दरवर्षी, रस्त्यांवरील खडड्यांची दुरूस्ती करायला लागणे, हा प्रकार नेमेची होतो. यामध्ये अनेकांना रोजगार मिळतो, काहींना प्रसिध्दी तर काहींना मेवा, अन प्रसारमाध्यमांना आवश्यक असणारे कन्टेट (content) मिळते. महानगरपालिकेला अगणिक खड्ड्यांच्या माध्यमातून रेन-हार्वेस्टिंगचे प्रकल्प (Rain Harvesting Projects) पुण्यात अनेक ठिकाणी राबवून पाण्याचा प्रश्न निकालात काढता येईल, नाही का? रस्त्यावरील खड्ड्यांचा मुकाबला करत गाडी चालवताना, अशी अनुभूती येते की जणू काही आपण एखाद्या माऊंटन रॅलीमध्ये भाग घेतला आहे की काय! त्यामुळे ड्रायव्हिंग लायसन्सची (driving license) परीक्षा आरटीओ खात्यामध्ये जाऊन आठचा आकडा काढून देण्यापेक्षा, रस्त्यावरील खड्ड्यांच्या माध्यमातून देणे जास्त इष्ट ठरावे. कार कंपन्यांना पण त्यांच्या नवनिर्मित गाडयांचे स्ट्रेस टेस्टिंग (stress testing) अगणिक खड्ड्यांच्या रस्त्यांवरून करणे कमी खर्चाचे जाणवेल. एवढेच काय, तर नासा (NASA) या अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्थेला सुद्धा, ग्रहांच्या असमतोल पृष्ठभागावर चालविण्याकरिता निर्माण केलेल्या अंतराळ-गाड्यांच्या चाचण्यांची कामे पुणे शहराला आऊटसोर्स (out-source) करता येतील.

आत्तापर्यंत आपण पॉझिटव्ह थिकिंग (positive thinking) करून रस्त्यावरील खड्ड्यांचे फ़ायदे विचारात घेतले. परंतु रस्त्यावरील ह्या खड्ड्यांतून काही "मिळवण्या"पेक्षा, आपण यातून बरेच काही गमावून पण बसतो, याचे भान अजूनही कोणालाही येत नाहीये, याची खंत वाटते. यामध्ये केवळ नागरिकांना शारिरीक त्रास (उदा. पाठदुःखी, मानदुःखी, तर कधी अकाली अपघाती मॄत्यु) होतो एवढेच नाही, तर अनेक बरेच वा‌ईट व दूरगामी परिणाम होत आहेत. उदाहरणार्थ, खड्डेग्रस्त रस्त्यांवरून हळूहळू वाहन चालवल्यामुळे अनमोल वेळ वाया जातो, पेट्रोल जास्त खर्ची पडते. त्यामुळे प्रदूषण वाढून पर्यावरण जास्त वेगाने दूषित होते. वाहनांच्या दुरूस्तीचा खर्च वाढतो आणि अनेक वाहनांचे आयुष्य पण कमी होते. पावसाचे पाणी किंवा चिखल भरलेल्या खड्डय़ांमधून गढूळ पाणी अथवा चिखल उडून कपडे खराब होतात, त्यामुळे कपडयांच्या धुला‌ईचा खर्च, ह्या धुला‌ईकरिता साबण व पाण्याची अधिक गरज भासते, इत्यादी...

उत्तम रस्ते हा पायभूत सुविधांचा एक अत्यंत महत्वाचा घटक आहे. पण रस्तेच जर सतत खराब असतील तर याचा उद्योगवाढींवर व एकूणच अर्थव्यवस्थेवर फ़ार दूरगामी परिणाम होतो. अशाप्रकारे कायम खराब असणाऱ्या रस्त्यांच्या शहरांमध्ये, आर्थिक गुंतवणूक करायला फ़ार कोणी उत्सुक नसतात आणि याचा आर्थिक विकासावर विपरित परिणाम होतो. परंतु, ह्या परिणामांचा खोलवर विचार करणारी मंडळी सरकारी खात्यांमध्ये व राजकीय वर्तुळात सापडणे म्हणजे, ओसाड रणरणत्या वाळवंटामध्ये थंडगार पाणी सापडण्या‌इतके मुश्किल आहे. हा सर्व प्रकार नेमेची येत असल्याने, रस्त्यांवरील खड्डे व त्यांची वार्षिक दुरूस्ती याकरिता सरकारने जणू काही आरक्षणच करुन ठेवले आहे की काय, असे वाटणे साहजिक आहे. आजकाल क्षणोक्षणी बदलणाऱ्या ह्या धावत्या युगात, रस्त्यांवरील खड्डे मात्र ही एक न बदलणारी शाश्वत चीज़ बनून राहिलेली आहे.

रस्त्यांवरील खड्ड्यांचा मेक-अप करण्यापेक्षा, ते कायमस्वरूपी व्यवस्थित करणे, असे सर्वांनाच वाटत आहे. एक साधे छोटेसे बेट असणाऱ्या सिंगापूर सारख्या देशामध्ये वर्षभर पाऊस पडत असतो. परंतु तेथील रस्ते उत्तम प्रतीचे असून, पावसाच्या पाण्याचा निचरा उत्तम प्रकारे होतो. सिंगापूर सारख्या छोटया देशाला जर हे जमत असेल तर, जागतिक महासत्ता बनू पाहणाऱ्या भारतासारख्या मोठया देशातील पुणे (आता मुंबई सुध्दा) शहराला रस्त्यांवरील खड्डे कायम स्वरूपी दुरूस्त करणे, हे एक शिवधनुष्य का वाटावे? दही-हंडी, गणेशोत्सव, नवरात्र इत्यादी सणांकरिता रस्त्यावर खड्डे पाडून उभारलेले मांडव, इतकेच काय तर सातत्याने रस्त्यावर खड्डे पाडून उभारली जाणारी राजकीय व्यक्‍तींना शुभेच्छा देणारी फ़लके - या गोष्टी रस्त्यावरील खड्ड्यांच्या समस्येमध्ये आणखिनच भर टाकत आहेत. अशाप्रकारच्या उत्सवांच्या मांडवांवर व शुभेच्छा फ़लकांवर अतोनात पैसे खर्च करण्यापेक्षा रस्त्यावरील खड्डे कायमस्वरूपी मिटवले गेले तर, प्रत्येक नागरिक मनापासून शुभेच्छा देतील, यात काहीच शंका नाही.

- शैलेन्द्र मुसळे, पुणे
E-mail: smusale@gmail.com