रविवार, मई 15, 2011

हिन्दी सिनेजगत: बदलांच्या वळणावर...


चल येतोस का सिनेमाला? असं कुणी विचारलं तर, आधी मी त्या सिनेमाचे नाव काय आहे किंवा त्यात कोणी काम केलेले आहे, हे न विचारता, त्या सिनेमात "आईटेम साँग" आहे का? हे जरूर विचारतो. आता तुम्ही विचाराल हा काय प्रश्न झाला? आजकाल तर प्रत्येक सिनेमात "आईटेम साँग" असतेच, तो चित्रपटाचा एक अविभाज्य भागच झाला आहे आणि किंबहुना "आईटेम साँग"च बघायला बहुंताशी लोकं जात असावीत. हिन्दी सिनेमाबरोबर मराठी सिनेमा सुध्दा ह्या "आईटेम साँग"च्या कचाट्यातून सुटलेला नाही. परंतु, सिनेमाचा विषय व पटकथा उत्तम असेल तर त्या चित्रपटाला "आईटेम साँग"च्या आधाराची गरज़ नसते, या मताचा मी आहे. आणि म्हणूनच एखादा सिनेमा पहावा की नाही यासाठी त्या चित्रपटामध्ये "आईटेम साँग" नसण्याचा निकष मी लावतो. पूर्वीच्या, म्हणजे ७०-८० च्या दशकातील सिनेमामध्ये सुध्दा (एकाप्रकारे) "आईटेम साँग" असायची - म्हणजे "कॅब्रे साँग", जी (बहुतेक वेळा) आशा भोसले यांनी गायलेली असायची, हेलनने त्यामध्ये नृत्य केलेले असायचे व आर. डी. बर्मनने संगीत दिलेले असायचे. असे असले तरी त्याचबरोबर, सिनेमाचा विषय व पटकथा सक्षम असायची. असो, "आईटेम साँग" हाच केवळ ह्या लेखाचा विषय नाही.

७०-९० च्या दशकामध्ये कलात्मक सिनेमांची निर्मिती होत होती. काही दिग्दर्शक/निर्माते (उदा. गुलज़ार, बासु चटर्जी, हॄषिकेश मुखर्जी, सई परांजपे इत्यादी.) असे पण होते की जे कलात्मक व व्यावसायिक सिनेमे या दोहोंचा संगम असलेल्या सिनेमांची निर्मिती करायचे - ज्याद्वारे मनोरंजनाबरोबर एखादा सामाजिक विषय व नविन विचार प्रेक्षकांसमोर मांडला जात असे. अशाप्रकारचे सर्वच सिनेमे प्रेक्षकांपर्यंत पोचले नाहीत आणि याला मुख्य कारण असे होते की वितरकांना त्यात पैसे मिळत नसायचे. गुलज़ार यांचा "लिबास" हा असाच एक चित्रपट आहे, ज्याची निर्मिती पूर्ण झालेली आहे, त्याचे संगीत सीडी वर उपलब्ध आहे, परंतु आजतागायत हा सिनेमा थिएटरला प्रदर्शित झालेला माझ्या ऐकिवात नाही. या सिनेमाची गाणी आर. डी. बर्मन यांनी संगीतबध्द केलेली होती आणि ती लोकप्रिय झालेली आहेत. अजून एक बाब म्हणजे, या सिनेमात नसीरद्दीन शाह, राज बब्बर, शबाना आज़मीउत्पल दत्त या कलाकारांनी अभिनय केलेला आहे. गुलज़ार यांचा हा सिनेमा पाहण्याची मला खूप उत्सुकता आहे व कधीतरी हा सिनेमा प्रदर्शित होईल, अशी मी आशा अजुनही बाळगून आहे.

८०-९० च्या दशकामध्ये, रोमँटिक सिनेमांची लाट आली होती. यामध्ये बाज़ीगर, कयामत से कयामत तक, आशिकी, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, साज़न, हम आपके है कौन, राम लखन, खलनायक वगैरे संगीतप्रधान सिनेमे येऊन गेले. या लाटेमध्ये संगीताचे बाज़ारीकरण (commercialization) झाले. जे विकले जाईल तेच निर्मित केले जायचे, त्यामुळे नाविन्यपूर्ण विषय व त्याचबरोबर उत्तम व प्रयोगशील संगीत यांकडे दुर्लक्ष केले गेले. कारण बाज़ारीकरणामध्ये निर्मात्यांना व वितराकांना हा धोका पत्करायचा नव्हता. खात्रीशीर नफ़ा देणारे चित्रपट व संगीत यांचीच निर्मिती केली गेली. संगीताच्या बाज़ारीकरणाची ही लाट, उत्तम प्रतिभा, प्रयोगशीलता व नाविन्य असलेले काही चांगले दिग्दर्शक व संगीतकार आपल्यापासून दूर घेऊन गेली.

गेल्या काही वर्षांमध्ये झालेल्या बदलांमधील चांगला भाग म्हणजे, सिनेमांची निर्मितीसंख्या वाढली आहे, नफ़ा वाढला आहे व निर्मितीकरिता लागणारे खेळते भांडवल सुध्दा बाजारात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. असे म्हणले जाते की फ़ॅशनजगतामध्ये पूर्वीचीच फ़ॅशन बदलस्वरूपात पुन्हा एकदा (साधारणतः १० वर्षांनंतर) येत असते व हिन्दी सिनेजगत पण याला अपवाद नाही. नुसतेच "आईटेम साँग" असलेले सिनेमे नाही तर, वेगळया धाटणीचे, नाविन्य व प्रयोगशीलता असलेले सिनेमेसुद्धा आता येत आहेत, आणि ही एक चांगली बाब आहे. अशा सिनेमांची निर्मिती करण्यामध्ये, काही नवोदित निर्माते व दिग्दर्शक आहेत तर काही कलाकार पण आहेत. आमीर खान हा अभिनेता अशा वेगळया धाटणीचे, नाविन्य व प्रयोगशीलता असलेल्या सिनेमांच्या निर्मितीकरिता फ़िल्म इंडस्ट्रीमध्ये प्रसिध्द आहे. लगान, दिल चाहता है, रंग दे बसंती, फ़नाह, तारे ज़मीन पर, गज़नी, थ्री इडिएटस, धोबी घाट, इत्यादी त्याचे सिनेमे "आईटेम साँग" नसून सुध्दा बॉक्स ऑफ़िसवर उत्तम चालले व इतकेच नाही तर काही चित्रपट ऑस्कर पुरस्काराकरिता नामांकित पण केले गेले. आणखीन काही निर्माते व दिग्दर्शकांमध्ये, विशाल भारद्वाज, विधू विनोद चोप्रा, संजय लीला भन्साळी व राजकुमार हिरानी यांची नावे देता येतील. अगदी अलीकडचे उदाहरण म्हणजे लारा दत्ता, जिने आपला पति (प्रसिध्द खेळाडू) महेश भूपती बरोबर काढलेला "चलो दिल्ली" हा सिनेमा. येथे आणखी एका सिनेमाचा मला आर्वजून उल्लेख करावासा वाटतो व तो सिनेमा म्हणजे "वेनस्डे (Wednesday)". वेनस्डे हा एक असा चित्रपट होता की तो सक्षम कथा/पटकथा, उत्तम दिग्दर्शन, अभिनय व सादरीकरणांमुळे प्रेक्षकांची गर्दी व प्रशंसा मिळवण्यात यशस्वी झाला. ह्या सिनेमामध्ये "आईटेम साँग" तर दूरच, पण एकही गाणे असे नव्हते व अवाढव्य निमिर्ती खर्च तर मुळीच नव्हता, हे विशेष!

बदलांमधील आणखिन एक चांगला भाग म्हणजे, कथेतील बदल. याआधी मल्टीस्टारकास्ट सिनेमे निर्मित केले जायचे व यामध्ये मनमोहन देसाई, सिप्पी ब्रदर्स व सुभाष घई या निर्मात्यांची नावे समोर येतात. अमर अकबर अँथनी, जॉन जॉनी जनार्दन, शान, कर्मा, राम लखन इत्यादी सिनेमे उदाहरणदाखल देता येतील. या सिनेमामध्ये प्रत्येक हिरोंच्या आपपल्या प्रेमकथा, अ‍ॅक्शन व मेलोडियस गाणी (आणि बिग बी अमिताभ बच्चन) या गोष्टी प्रेक्षकांना थिएटरकडे खेचून आणित असत. अलिकडच्या चित्रपटांमध्ये मल्टीस्टारकास्ट जरी नसली तरी, चांगल्या बदलाचा एक भाग म्हणून, तीन ते चार कथा एकाच वेळी दाखवणारे सिनेमे निर्मित केलेले दिसून येतात. अशा चित्रपटवर्गांमध्ये, मुंबई मेरी जान, ये मेरा इंडिया, मेट्रो, धोबी घाट व नुकतेच प्रदर्शित झालेले "आय एम" (I am...) व शोर इन द सिटी (Shor in the city) हे चित्रपट येतात. या चित्रपटांमध्ये तीन चार कथा दाखविण्यात आलेल्या आहेत, ज्यामध्ये प्रत्येक कथेमध्ये एक वेगळी परिस्थिती, वेगळया वयोगटातील नायक-नायिका, किंवा फ़क्त नायक, अथवा फ़क्त नायिका दिसून येतील. या सिनेमांमध्ये दिसून येईल की गाण्यांना महत्व कमी आहे व गाणी बॅगराऊँडमध्ये वापरण्यात आली आहेत. महत्वाची बाब म्हणजे अशा वेगळया धाटणीच्या चित्रपटांना निर्माते व वितरक आता मिळत असून, प्रेक्षकवर्ग पण पसंती दाखवत आहे. ह्या प्रेक्षकवर्गामध्ये तरूणांची संख्या पण तेवढीच दिसून येण्याएवढी आहे. आणखी काही वेगळया टाईपच्या अशा चित्रपटांबद्दल लिहायचे झाले तर "संकट सिटी", दस तोळा (या दोन्ही चित्रपटांमध्ये प्रसिध्द मराठी कलावंत दिलीप प्रभावळकर यांनी एक वेगळी व छान भूमिका केलेली आहे), रामचंद पाकिस्तानी, महारथी, रोड टू संगम (यामध्ये मराठीतील कलावंत स्वाती चिटणीस यांनी उत्तम भूमिका केलेली आहे), सोच लो, फ़ँस गए रे ओबामा, तेरे बिन लादेन हे मला आवडलेले सिनेमे आहेत. परंतु हे सिनेमे १-२ अठवडयापेक्षा जास्त काळ थिएटरमध्ये राहिलेले नाहीत, त्यामुळे वेळेवर न बघितल्यास हे सिनेमे आपल्याला नंतर सीडीवर बघावे लागतात. टिव्ही चॅनेलवर पण हे चित्रपट दाखवले जाण्याची शक्यता फ़ार कमी आहे. असे असून सुध्दा, असे वेगळयाप्रकारचे चित्रपट निर्मिले जात आहेत, हे काही थोडे थोडके नाही.

इंटरनेट व सोशल नेटवर्कींग (social networking) या माध्यमांचा अशा चित्रपटांच्या प्रसिध्दी मध्ये मोलाचा वाटा आहे. एखादा चित्रपट आवडला की, माऊथ पब्लिसिटी प्रमाणेच इंटरनेट (ई-मेल, चॅटींग) व सोशल नेटवर्कींगच्या (फ़ेसबुक, ट्विटर, गुगल बज़ इत्यादी) विविध संकेतस्थळांमधून ह्या चित्रपटांचे परिक्षण (reviews) दिले जाते व त्यातून अशा वेगळया धाटणीच्या चित्रपटांचा प्रेक्षकवर्ग वाढायला मदत होत आहे. त्यामुळे अशा चित्रपटांच्या निर्मितीसंख्येमध्ये अधिक-अधिक वाढ होत आहे. नविन कलावंत सुध्दा एकाच टाईपच्या भूमिकेमध्ये राहून पैसे कमवण्यापेक्षा, अशा चित्रपटांमधून विविध प्रकारच्या भूमिका करण्याचे धाडस करताना दिसून येत आहे व ही निश्चितच उल्लेखनीय बाब आहे.

असे वेगळेपण व विविधता जरी चित्रपटांमधून दिसून येत असली तरी ती चित्रपटांच्या गाण्यांमधून अजून दिसत नाहिये. एकाच टाईपची गाणी, ठराविक पाश्चात्य रिदमवर दुःखी व आनंदी गाणी रचल्याचे दिसून येते. एखादी वेगळी रचना, काही नविन प्रयोग, नविन वाद्यांचा वापर यांचा अभाव प्रकर्षाने जाणवतो. डिजे व्हर्जन (DJ version) करतायेतील अशी गाणी तयार केली जातात, कारण चित्रपट जरी चालला नाही तरी नंतर डिजे व्हर्जन अथवा रिमिक्स व्हर्जन मार्फ़त ही गाणी हिट करून आणखी जास्त पैसे ओढण्याचा प्रयत्न केला जातो. गीतलेखन किंवा गाण्याचे शब्द या बदलांमध्ये मागे पडत चालले आहे. गाण्याचे शब्द अगदी क्वचितच ऐकू येतात. एकंदरीत आजकाल झिंगून नाचता येण्यासारख्या रिदमवर आधारित गाण्यांना अधिक पसंती दिली जात आहे. म्हणूनच कि काय, तर गीताचे शब्द जरी चांगले नसले तरी "मुन्नी बदनाम हूई" व "माय नेम इज़ शीला, शीला की ज़वानी" सारखी गाणी सुपरहिट होऊन, एखाद्या सोहळयात पुरस्कार मिळवून जातात व नंतर सणांच्या दिवशी (होळी, गणेशोत्सव) सगळयांना झिंगायला पुरेपूर मदत करतात. खलनायक चित्रपटातील "चोली के पीछे क्या है.." हे गाणे बरेच वादग्रस्त झालेले होते, व ह्या गाण्याच्या विरोधात माध्यमांमधून व समाजामधून बरीच ओरड झाली होती. तो विरोध व ती ओरड, "मुन्नी बदनाम हूई" व "माय नेम इज़ शीला, शीला की ज़वानी" ह्या गाण्यांच्या बाबतीत कुठेच दिसून आली नाही. कदाचित, अशी "आईटेम साँग" गाणी आता आपल्या सर्वांच्या अंगवळणी पडली असावीत (?)

आज गाण्यांची ही परिस्थिती असली तरी काही चांगल्या गोष्टी पण घडत आहेत. काही चांगली गाणी असणारे चित्रपट अजूनही येत आहेत. "तारे ज़मीन पर" अथवा "थ्री इडिएटस" या अशा वेगळया चित्रपटांमधील गाणी उदाहरणदाखल देता येतील, ज्यामध्ये संगीत व गाण्यांचे शब्द दोन्ही तितकेच प्रभावी आहेत. मराठी सिनेमांमधील उदाहरण द्यायचे झाल्यास, "आता वाजले की बारा, मला जाऊ द्या ना घरी" हे गाणे पारंपारिक लावणी स्वरूपातील असून, "आईटेम साँग" जरी नसले, तरी उत्तम संगीत, शब्द व सादरीकरणामुळे सुपरहिट झाले व प्रेक्षकांची गर्दी खेचण्यामध्ये यशस्वी झाले.

तसेच पूर्वी तयार केलेली पण आजतागायत प्रदर्शित न झालेली गाणी, आज श्रोत्यांपर्यंत पोचवण्याचे काम काही नामवंत म्युझिक कंपन्या करत आहेत. युनिर्व्हसल म्युझिक (Universal Music) ही त्यापैकी एक कंपनी आहे. या कंपनीने काही स्पेशल अल्बमच्या माध्यमातून, मदन मोहन, मोहमंद रफ़ी, आर. डी. बर्मन यांची प्रदर्शित न झालेली गाणी रसिकांपर्यंत पोहचवण्याचे अनमोल काम केलेले आहे. ही गाणी अशी होती की जी तयार केली गेलेली होती, परंतु चित्रपटांच्या व सीडीच्या अथवा एलपीच्या लांबीच्या मर्यादेमुळे, तसेच काही इतर कारणांमुळे प्रदर्शित होऊ शकली नाहीत. प्रसिध्द चित्रपट निर्माते यश चोप्रा यांनी सुध्दा मदन मोहन यांच्या काही न वापरलेल्या चाली घेऊन, वीरझारा या चित्रपटांमध्ये वापरून, ती गाणी सुप्रसिध्द करून दाखविली आहेत. वीरझाराच्या गाण्याच्या अल्बममध्ये एक स्पेशल सीडी अशी प्रदर्शित केलेली आहे की ज्यामध्ये खुद्द मदन मोहन यांच्या आवाज़ात ह्या गाण्यांच्या चाली आपल्याला ऐकायला मिळतात. तसेच युनिर्व्हसल म्युझिकने अनटोल्ड स्टोरीज़ (Untold Stories) ह्या अल्बमद्वारे आर. डी. बर्मन यांच्या काही गाण्याच्या चाली कशा तयार झाल्या, त्याच्याशी निगडित रंजक गोष्टीं काय होत्या, ही माहिती रसिकांपर्यंत पोचवण्याचे प्रशंसनीय काम केलेले आहे.

चित्रपट माध्यमात होत असलेले हे बदल, वेगळयाप्रकारच्या ("आईटेम साँग" विरहीत...) चित्रपटांची निर्मिती व त्यांचा वाढता प्रेक्षकवर्ग, ही निश्चितच नविन कल्पनांना प्रोत्साहित करणारी, कल्पनाशक्तीला वाव देऊन, वैविध्यपूर्ण चित्रपट आपल्या प्रेक्षकवर्गाकरिता घेऊन येणार आहे, याची मला खात्री आहे. प्रत्येक बदल हा काही चांगले व काही वाईट आपल्याबरोबर घेऊन येत असतो. या बदलांमधील चांगल्या बाबींना पसंती देऊन, आपल्या भावी पिढीकरिता, एक चांगली चित्रपट संस्कॄती निर्माण होण्यामध्ये व ती टिकवण्यामध्ये आपल्या प्रेक्षकवर्गावर महत्वाची जबाबदारी आहे. चॉईस हा आपला असणार आहे! आणि मग मलासुध्दा चित्रपटाला जाताना त्यात "आईटेम साँग" आहे का नाही, हा प्रश्न विचारायची गरज़ भासणार नाही...

शैलेन्द्र मुसळे, पुणे (Shailendra Musale, Pune. E-mail: smusale@gmail.com)
------------------------------------------------------------------------------------------------------------------------

लेबल: , , ,

सोमवार, सितंबर 04, 2006

परनिंदा आणि प्रशंसा

परनिंदा प्रकाशाच्या गतीने जास्तच पसरतात आणि दुसऱ्याची प्रशंसा मुंगीच्या गतीने चालतात.
योगसंदेश - गुरुवार २३ मार्च, २००६

Eat you frog early in the morning

बेडूक खाणे ही अंगावर शहारे आणणारी कॄती, कठीण, क्लेशकारक कामाचे सूचक प्रतीक आहे. असे कठीण काम दिवसाच्या प्रारंभीच केले की त्याच्या तुलनेत दिवसाची बाकीची कामे हलकी वाटतात आणि महत्वाचे कार्यही उरकले जाते. ऑफ़िसची सर्व कामे करतानाही, स्वतःचा अभ्यास आणि प्रगती संभाळणे म्हणजेच multi-tasking.

हे सर्व करताना माझी कुतरओढ होते हो, म्हणून टाहो कसला फ़ोडायचा? निधडया छातीने, सुहास्य मुद्रेने, ही कामे अंगाखांद्यावर घ्यायची.

-- लोकसत्ता रविवार २ एप्रिल, २००६ लोकरंग पुरवणी

व्हिजन - Vision

अनेक माणसं कोशात जगतात. मुखवटा यशस्वी असतो, पण चेहरा मात्र घाबरट असतो, असमाधानी वृत्तीचा. आता जिथं जोखीम हाच आत्मा आहे, तिथं माणसं असमाधानी, घाबरट असून चालणार नाही. धमाल करायला, अगदी कोणत्याही परिस्थितीत अंगात मुळातच धमक असावी लागते.

तुमच्या आसपास असणारी अशी कोणतीही यशस्वी व्यक्‍ती घ्या, तुम्हाला त्यांच्या आयुष्याला, जगण्याला एक व्हिजन होती, असे जाणवेल. व्हिजन म्हणजे स्वप्नासारख्या अगर समाधीसारख्या अवस्थेत अंर्तज्ञानाने दिसणारी गोष्ट. व्हिजन म्हणजे उद्या जिथून सुरूवात होणार आहे तो क्षण.

व्हिजनमुळे आणखीन एक गोष्ट घडते ती म्हणजे, आपण हे सर्व का करीत आहोत, यामधील कार्यकारण भावाविषयीची सुस्पष्टता. व्हिजनवर श्रध्दा ठेवणं आणि प्रवास करणं, हे विलक्षण सामर्थ्याचे लक्षण आहे.

"आमच्या व्यवसायात आम्हाला प्रथम क्रमांक मिळवायचा आहे" - हे व्यवसायाचं उद्दिष्ट आहे. त्यातून कंपनीची महत्त्वाकांक्षा दिसते, पण "व्हिजन" दिसत नाही.
"आम्हाला सर्वात फ़ायदेशीर कंपनी व्हायची आहे" --> पैसा कोणत्याही धंद्यातून मिळतोच की, पण तुम्ही नेमक्या याच व्यवसायात का आहात, यावर सगळं अवलंबून नाही का? व्हिजनमध्ये ते अपेक्षित आहे.

यशस्वी मानसिकता

माणूस मोठा होतो तो त्याच्या मानसिकतेमुळे, विचारसरणीमुळे. माणसाला आयुष्यात यशस्वी करीत असते ती त्याची मानसिकता.

अफ़ाट लोकप्रियता व संपन्नता प्राप्त केलेली यशस्वी माणसे मोठे यश मिळवतात, याचे प्रमुख कारण म्हणजे यशस्वी करणाऱ्या सवयी त्यांनी जडवलेल्या असतात.

तंत्रज्ञान

कुठलेही तंत्रज्ञान वाईट नसते. त्याचा वापर करणाऱ्या माणसाची मानसिकता ही खरी समस्या असते. तसे पाहिले तर, तंत्रज्ञान नवनव्या समस्यांना जन्म देते, पण तंत्रज्ञानातच या समस्यांचा निराकरणाचा मार्गही दाखविते.

शुक्रवार, अगस्त 25, 2006

रस्त्यांवरील खड्डयांचा "मेक-अप" करणे सोडून द्या !

रस्त्यांवरील खड्डयांचा "मेक-अप" करणे सोडून द्या !

सलग दुसऱ्यावर्षीही पडण्याऱ्या मुसळधार पावसांमुळे रस्त्यांवरील खड्डे पुनःश्च जिवंत झालेले आहेत व त्यांबद्दल वर्तमानपत्रांमधून बरेच काही लिहून येत आहे. रस्त्यांवरील खड्डे परत जिवंत होऊ नयेत म्हणून, शास्त्रोक्‍त पध्दतीने ते कसे मिटवता येतील या संदर्भात अनेक तज्ञांकडून मार्गदर्शकपर लेख पण प्रसिध्द झालेले आहेत.

नेमेची येतो पावसाळा, त्याप्रमाणे पुण्यातील रस्त्यांच्या बाबतीत पण काही गोष्टी नेमेचीच होतात. म्हणजे असे की, नेमेचीच येतात रस्त्यांवरील खड्डे, खड्डयांच्या कामांतील व चालू असलेल्या रस्त्यांच्या कामांतील दिरंगा‌ई. आणि मग नागरिकांची निदर्शने होतात. या सर्व "उलाढालीं"मध्ये, रस्त्यांचा वापर करणारा सामान्य नागरिक मात्र, दररोज खड्डयांची परीक्षा दे‌ऊन दे‌ऊन स्वतः परीक्षार्थी हो‌ऊन जातो. तर दुसरीकडे काही गट (उदा. राजकीय पक्ष, कंत्राटदार, महानगरपालिकेतील काही विभाग इत्यादी) लाभार्थी गटांमध्ये सामावल्यामुळे जास्तीत जास्त मेवा खा‌ऊन तॄप्त असतात. या लाभार्थी गटाकडे नजर टाकली तर या सर्व "उलाढालीं"चा व्याप "नेमेची" का होतो, याचा उलगडा कुठल्याही सुज़ाण नागरिकाला होईल. एखादा राजकीय पक्ष ही संधी पकडून आपली व आपल्या पक्षाची प्रसिद्धी करून घेतात. पावसाळा तोंडावर आला असताना, रस्तेबांधणी व रस्तेदुरूस्तीची कामे योगायोगाने (?) अर्धवटच राहतात, आणि मग ही कामे घेणारे कंत्राटदार अर्जंट बेसिस-वर महानगरपालिकेला अर्जंट चार्जेस लावून, रस्त्यांची व रस्त्यांवरील खड्डे-बुज़वण्याची कामे कशीतरी करून मोकळी होतात. पुन्हा मुसळधार पा‌ऊस पडून गेला की परत खड्डे पुर्नजन्म घेऊन पृथ्वीतलावर अवतरतात. मग परत नागरिकांची ओरड, कंत्राटदार पुन्हा हे खड्डे ढिगळे लावल्याप्रमाणे झटपट भरून मोकळे होतात. आणि मग, मेक-अप केलेला चेहरा पाण्याने धुतल्यावर, जसा मेक-अप निघून जातो, तसे रस्त्यांवरील कात झडून जाऊन, त्यांच्यावरील खड्डे पुनःश्च अवतीर्ण होतात.

अशाप्रकारची कामाची पध्दत जणू काही सॉफ़्टवे‌अर क्षेत्रातून आली काय असे वाटायला लागते. सॉफ़्टवे‌अर क्षेत्रामध्ये, बाजारात रिलिज़ (release) झालेले सॉफ़्टवे‌अरचे एखादे व्हर्जन (version) कधीच परिपूर्ण नसते. त्यात काहीप्रमाणात त्रुटी (bugs) राहिलेल्या असतात आणि सॉफ़्टवे‌अर कंपन्या ह्या त्रुटी भरून काढून एकामागोमाग एक अशी सॉफ़्टवे‌अरची व्हर्जन्स बाजारात रिलिज़ करत असतात. काहीसे अशाच प्रकारचे चित्र, आजकाल अनेक क्षेत्रांमध्ये दिसते. बाजारात एकामागोमाग सारख्या येणाऱ्या मोटारबा‌ईक्सची विविध मॉडेल्स, याचे एक उत्तम उदाहरण म्हणून देता ये‌ईल. एखादे उत्पादन अथवा सेवा परिपूर्ण अन समाधानपूर्वक दिली जाणे, असे आजकाल फ़ार क्वचितच पहायला मिळते. कदाचित आजच्या या जागतिकीकरणाच्या युगात, अशाप्रकारे अर्धवट सेवा व अर्धवट उत्पादन पुरविणे, हा आर्थिक प्रगतीचा एक यशस्वी मार्ग होऊन बसलेला आहे, याची जाणीव होते.

अशाप्रकारे, दरवर्षी, रस्त्यांवरील खडड्यांची दुरूस्ती करायला लागणे, हा प्रकार नेमेची होतो. यामध्ये अनेकांना रोजगार मिळतो, काहींना प्रसिध्दी तर काहींना मेवा, अन प्रसारमाध्यमांना आवश्यक असणारे कन्टेट (content) मिळते. महानगरपालिकेला अगणिक खड्ड्यांच्या माध्यमातून रेन-हार्वेस्टिंगचे प्रकल्प (Rain Harvesting Projects) पुण्यात अनेक ठिकाणी राबवून पाण्याचा प्रश्न निकालात काढता येईल, नाही का? रस्त्यावरील खड्ड्यांचा मुकाबला करत गाडी चालवताना, अशी अनुभूती येते की जणू काही आपण एखाद्या माऊंटन रॅलीमध्ये भाग घेतला आहे की काय! त्यामुळे ड्रायव्हिंग लायसन्सची (driving license) परीक्षा आरटीओ खात्यामध्ये जाऊन आठचा आकडा काढून देण्यापेक्षा, रस्त्यावरील खड्ड्यांच्या माध्यमातून देणे जास्त इष्ट ठरावे. कार कंपन्यांना पण त्यांच्या नवनिर्मित गाडयांचे स्ट्रेस टेस्टिंग (stress testing) अगणिक खड्ड्यांच्या रस्त्यांवरून करणे कमी खर्चाचे जाणवेल. एवढेच काय, तर नासा (NASA) या अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्थेला सुद्धा, ग्रहांच्या असमतोल पृष्ठभागावर चालविण्याकरिता निर्माण केलेल्या अंतराळ-गाड्यांच्या चाचण्यांची कामे पुणे शहराला आऊटसोर्स (out-source) करता येतील.

आत्तापर्यंत आपण पॉझिटव्ह थिकिंग (positive thinking) करून रस्त्यावरील खड्ड्यांचे फ़ायदे विचारात घेतले. परंतु रस्त्यावरील ह्या खड्ड्यांतून काही "मिळवण्या"पेक्षा, आपण यातून बरेच काही गमावून पण बसतो, याचे भान अजूनही कोणालाही येत नाहीये, याची खंत वाटते. यामध्ये केवळ नागरिकांना शारिरीक त्रास (उदा. पाठदुःखी, मानदुःखी, तर कधी अकाली अपघाती मॄत्यु) होतो एवढेच नाही, तर अनेक बरेच वा‌ईट व दूरगामी परिणाम होत आहेत. उदाहरणार्थ, खड्डेग्रस्त रस्त्यांवरून हळूहळू वाहन चालवल्यामुळे अनमोल वेळ वाया जातो, पेट्रोल जास्त खर्ची पडते. त्यामुळे प्रदूषण वाढून पर्यावरण जास्त वेगाने दूषित होते. वाहनांच्या दुरूस्तीचा खर्च वाढतो आणि अनेक वाहनांचे आयुष्य पण कमी होते. पावसाचे पाणी किंवा चिखल भरलेल्या खड्डय़ांमधून गढूळ पाणी अथवा चिखल उडून कपडे खराब होतात, त्यामुळे कपडयांच्या धुला‌ईचा खर्च, ह्या धुला‌ईकरिता साबण व पाण्याची अधिक गरज भासते, इत्यादी...

उत्तम रस्ते हा पायभूत सुविधांचा एक अत्यंत महत्वाचा घटक आहे. पण रस्तेच जर सतत खराब असतील तर याचा उद्योगवाढींवर व एकूणच अर्थव्यवस्थेवर फ़ार दूरगामी परिणाम होतो. अशाप्रकारे कायम खराब असणाऱ्या रस्त्यांच्या शहरांमध्ये, आर्थिक गुंतवणूक करायला फ़ार कोणी उत्सुक नसतात आणि याचा आर्थिक विकासावर विपरित परिणाम होतो. परंतु, ह्या परिणामांचा खोलवर विचार करणारी मंडळी सरकारी खात्यांमध्ये व राजकीय वर्तुळात सापडणे म्हणजे, ओसाड रणरणत्या वाळवंटामध्ये थंडगार पाणी सापडण्या‌इतके मुश्किल आहे. हा सर्व प्रकार नेमेची येत असल्याने, रस्त्यांवरील खड्डे व त्यांची वार्षिक दुरूस्ती याकरिता सरकारने जणू काही आरक्षणच करुन ठेवले आहे की काय, असे वाटणे साहजिक आहे. आजकाल क्षणोक्षणी बदलणाऱ्या ह्या धावत्या युगात, रस्त्यांवरील खड्डे मात्र ही एक न बदलणारी शाश्वत चीज़ बनून राहिलेली आहे.

रस्त्यांवरील खड्ड्यांचा मेक-अप करण्यापेक्षा, ते कायमस्वरूपी व्यवस्थित करणे, असे सर्वांनाच वाटत आहे. एक साधे छोटेसे बेट असणाऱ्या सिंगापूर सारख्या देशामध्ये वर्षभर पाऊस पडत असतो. परंतु तेथील रस्ते उत्तम प्रतीचे असून, पावसाच्या पाण्याचा निचरा उत्तम प्रकारे होतो. सिंगापूर सारख्या छोटया देशाला जर हे जमत असेल तर, जागतिक महासत्ता बनू पाहणाऱ्या भारतासारख्या मोठया देशातील पुणे (आता मुंबई सुध्दा) शहराला रस्त्यांवरील खड्डे कायम स्वरूपी दुरूस्त करणे, हे एक शिवधनुष्य का वाटावे? दही-हंडी, गणेशोत्सव, नवरात्र इत्यादी सणांकरिता रस्त्यावर खड्डे पाडून उभारलेले मांडव, इतकेच काय तर सातत्याने रस्त्यावर खड्डे पाडून उभारली जाणारी राजकीय व्यक्‍तींना शुभेच्छा देणारी फ़लके - या गोष्टी रस्त्यावरील खड्ड्यांच्या समस्येमध्ये आणखिनच भर टाकत आहेत. अशाप्रकारच्या उत्सवांच्या मांडवांवर व शुभेच्छा फ़लकांवर अतोनात पैसे खर्च करण्यापेक्षा रस्त्यावरील खड्डे कायमस्वरूपी मिटवले गेले तर, प्रत्येक नागरिक मनापासून शुभेच्छा देतील, यात काहीच शंका नाही.

- शैलेन्द्र मुसळे, पुणे
E-mail: smusale@gmail.com

बुधवार, जून 28, 2006

२७ जून, २००६ - पंचमचा ६७ वा वाढदिवस

आज राहुल देव बर्मन उर्फ़ पंचमचा ६७ वा वाढदिवस आहे. दरवर्षी २७ जूनला पुण्यामध्ये टिळक स्मारक मंदीरमध्ये पंचम-मॅजिक तर्फ़े पंचमवर दृकश्राव्य कार्यक्रम असतो. यावेळी, मी अमेरिकेत असल्याने मला ह्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहता येणार नाहिये, याची खंत वाटत आहे...

बुधवार, जुलाई 27, 2005

Welcome post

This is a welcome post.

I have created this blog to share some lines, comments or thoughts about the Marathi readings that I make.

Readers are free to share their comments and views.

Regards,

Shailendra
27 July, 2005